विदर्भातले
पर्यावरण
डॉ.
निलेश कमलकिशोर हेडा
संवर्धन
कारंजा
(लाड), जिल्हा वाशीम ४४४१०५
दूरध्वणी:
९७६५२७०६६६
1. विदर्भ स्थान व भूगोल:
काही
भूभागांवर निसर्ग आपल्या विविधतेचा, पर्यावरणीय सधनतेचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अविरत
वर्षाव करत असतो. असे प्रदेश मग जैवविविधतेने परिपूर्ण तर होतातच पण जोडीलाच मानवशास्त्रीय
विविधता सुद्धा त्या विभागात आपली दानद विखरुन टाकते. पर्यावरणाबाबतीतली समृद्धता ही
पर्यावरणीय विविधतेच्या एककात मोजल्या जायला हवी. जितकी जैवविविधता जास्त, जितकी अधिवासांची
विविधता जास्त तितकाच प्रदेश पर्यावरणीय दृष्टीने सधन.
ओरिएंटल,
आफ्रिकन आणि युरोशियन जैव प्रदेशांच्या (Biota)
त्रिकोणावर वसलेला भारत देश जैवविविधता, जनजातीय विविधता, अधिवास विविधतेच्या बाबतीत
सधन असा प्रदेश आहे. इथे एकाच वेळी बर्फाच्छादित पर्वतशृंखलांनी आच्छादलेला हिमालय
आहे तर रणरणते राजस्थानचे वाळवंट सुद्धा आहे. आपल्या सुपीक खोऱ्यात मानव संस्कृतीचा
उत्कर्ष घडऊन आणनारी गंगा, यमूना, नर्मदा, तापी, गोदावरी, कृष्णा, कावेरी अशा नद्यांची
खोरी आहेत. पच्छिम घाटातली, मध्यभारतातली, इशाण्य भारतातली आणि हिमालयातली घणदाट जंगले
आहेत. अशा विविधतेने नटलेल्या भारताच्या साधारणत: मध्य भागात वसलेला विदर्भ हा प्रदेश.
एकसुरीपनाकडून विविधतेकडे सतत वाटचाल करत राहणे हा निसर्गाचा मूळ स्वभाव आहे. अशा विविधतेचा
निसर्गाने विदर्भावर वर्षाव केलेला आहे.
नर्मदेच्या
खाली तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या चिंचोळ्या भागाला पेनीनसुलार इंडीया (Peninsular India) असे म्हणतात. अशा पेनिनसुलार
इंडीया मध्ये सातपुडाच्या, सह्याद्रीच्या अन पूर्वघाटातल्या पर्वत रांगा सोडल्या तर
उरलेल्या प्रदेशाला दख्खनचे पठार (Deccan Platue) म्हणतात. उंच अशा डोंगरांनी न वेढलेला
हा भाग पठारी आहे. अशा दख्खनच्या पठारात विदर्भ वसलेला आहे. गोंदीया, भंडारा, गडचिरोली,
चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा या अकरा जिल्हयांचा
समावेश विदर्भात केला जातो. यातील बहुतेक भाग तापी-पूर्णा तसेच वर्धा, पैनगंगा व वैनगंगा
या नद्यांच्या खोऱ्यात मोडतो. विदर्भाच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्य, पूर्वेस छत्तीसगड
राज्य, पश्चिमेस जळगाव, व जालना जिल्हे तसेच दक्षिणेस हिंगोली व नांदेड हे महाराष्ट्रातील
जिल्हे आणि आंध्र प्रदेश राज्य आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ ४५.८६८ चौ. कि.मी. इतके
असन समुद्र सपाटी पासून सरासरी उंची ५५३ मीटर ऎवढी आहे.
उत्तरेस
मेळघाट आणि पुर्वेस बालाघाट या दरम्यानच्या सुपीक पठारी खोऱ्याचा समावेश विदर्भात होतो.
पयानघाट म्हणूनही हा प्रदेश ओळखला जातो. या भागातील सर्वात उंच शिखर बैराट हे अमरावती
जिल्हयात चिखलदरा जवळ आहे. भूस्तरशास्त्रानुसार
(Geology)
विदर्भाचा समावेश दक्षिण ट्रॅपमध्ये (Deccan
Trap) होतो. शिलारसापासून तयार झालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी तो बनलेला आहे.
येथील भूस्तर प्रामुख्याने ग्रॅनाइट व चुनखडीयुक्त आहे.
2. पौराणीक संदर्भ:
प्राचीन
ग्रंथांत - विशेषत: ऋग्वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण, पुराणे यांत तसेच नंतरच्या काही
पत्रांत या शिवाय तवारीख, प्रवाशांची वृत्तांते आणि कोरीव लेखांतून विदर्भाचा उल्लेख
व-हाड, बेरार, वरदा तट, विदर्भ इत्यादी नावांनी करण्यात आलेला दिसतो. पयोष्णी, वरदा,
वेणा इत्यादी नद्यांचे व त्यांच्या काठांवरील तिर्थक्षेत्रांचे उल्लेख अनेक पौराणिक
साहित्यात येतात. विदर्भ नावाच्या राजाने या प्रदेशात आर्यांची वसाहत केली, त्यावरुनच
या प्रदेशास विदर्भ हे नाव दिले गेले असावे, अशी आख्यायिका आहे. यदुवंशाच्या भोजनामक
शाखेचा प्रमुख ऋषभदेव याचा पुत्र विदर्भ असल्याचे भागवत पुराणात म्हटले आहे, त्याला
हा प्रदेश मिळाल्याने या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळाले असावे, असे सांगितले जाते.
विदर्भातील जंगले ही अनेक पौराणीक ग्रंथामध्ये वर्णित दंडकारण्याचा भाग होते. नल दमयंतीची
कथा सुद्धा विदर्भाशी निगडीत आहे तसेच विदर्भातील कौडींन्यपुरचा उल्लेख महाभारतात आला
आहे. रामाची आजी ही विदर्भाची कन्या असल्याचेही वृत्तांत रामायणात बघायला मिळतो. महाकवी
कालीदास लिखीत मेघदूत ह्या संस्कृत काव्याची सुरुवातच विदर्भातील रामटेकच्या डोंगरावरुन
होते. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथेच अज्ञातवासात असतांना भिमाने किचकाचा वध केल्याचे
महाभारतात वर्णित आहे. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता ह्यांचे माहेर बुलडाणा
जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे होते.
विदर्भाच्या
नद्यांचा व्यवस्थित उल्लेख पौराणीक साहित्यामध्ये आलेला आहे उदा. वैनगंगा आणि वर्धा
नदीच्या संगमावर स्नान केले असता अश्वमेघ फलाची प्राप्ती होते तर वर्धा व पैनगंगा ह्यांच्या
वढा येथील संगमावर स्नान केले असता सहस्त्र गो दानाचे फळ मिळते असा संदर्भ मिळतो. वेणा
नदीच्या तिरावर उपोषण केले तर मयूर आणि हंस यांनी युक्त विमानाची प्राप्ती होते असे
उल्लेख आहेत.
3. जंगल
3.1
जंगलाचे
प्रमाण:
कधीकाळी
विदर्भाबद्दल ‘वऱ्हाड सोण्याची कुऱ्हाड’ असे म्हटल्या जायचे, ते विदर्भातील नैसर्गिक
साधनसंपत्तीच्या विपुलतेमुळेच म्हटल्या जात असावे. महाराष्ट्राच्या ३१.६ टक्के इतक्या
भौगोलीक क्षेत्राने व्यापलेल्या विदर्भात राज्याच्या ६० टक्के इतके वन आहे. विदर्भातील
बहुतांश वन हे गडचिरोली, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात विखुरलेले
आहे. जंगलाचा प्रकार हा शुष्क पाणगळीचे (Dry deciduous forest) जंगल हा आहे. विदर्भातल्या
जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी जंगल वाशिम जिल्ह्यात असून (एकुण भूभागाच्या ७.६६ %) सर्वात
जास्त गडचिरोली जिल्ह्यात (एकुण भूभागाच्या ७८.४०%) आहे (बघा तक्ता क्र. १).
जिल्हा
|
वनाचे
एकुण क्षेत्रफळ (वर्ग कि.मी.)
|
एकुण
भौगोलीक क्षेत्र (वर्ग कि.मी.)
|
वनाचे
प्रमाण
|
गडचिरोली
|
११६९४
|
१४४१२
|
७८.४०%
|
चंद्रपूर
|
५००५
|
१०६९५
|
४६.८० %
|
भंडारा
|
२६०६.१४
|
३७१६
|
४५.८१ %
|
गोंदिया
|
१५६१.७५
|
४८४३.१३
|
३५.०४ %
|
नागपुर
|
२८१८
|
९८९७
|
२८ %
|
अमरावती
|
३५७५
|
१२२१२
|
२९.२७ %
|
यवतमाळ
|
२२४४.५६
|
१३५८४
|
१६.५२ %
|
वर्धा
|
९७२
|
६३०९
|
१५.४० %
|
अकोला
|
४६७
|
५४१७
|
८.६२ %
|
बुलढाणा
|
८३७.९९
|
९६६१
|
८.६६ %
|
वाशीम
|
८१०.०९
|
५१५०
|
७.६६ %
|
तक्ता: १. विदर्भातील
जंगलाचे जिल्हावार प्रमाण
3.2
वन्य
जीव
विदर्भातल्या
वन्य जीवांमध्ये वाघ (Panthera tigris),
बिबट्या (Leopard, Panther, Panthera
pardus (Linn.)), काळविट (Antilope
cervicapra) सांभर (Cervus unicolor),
चितळ (Axix axis), भेकड (Barking deer,
Muntiacus muntjak), निल गाय (Boselaphus tragocamelus), वानर, लाल तोंड्या
माकड, रान डुक्कर, अस्वल, जंगली कुत्रे, उद मांजर (Civet, Paradoxurus hermaphroditus), रान रेडे, तडस (Hyena, Hyaena hyaena (Linn.), कोल्हे, लांडगे, राण
मांजर, वागाटी (Lepord cat, Felis
bengalensis Kerr), चांदी अस्वल (Ratel, Mellivora
capensis (Schreber)), मुंगूस, गवा (Indian Bison,
Bos gaurus H. Smith), चौसिंगा (Four
horned antelope, Tetracerus quadricornis
(Blainville)), खवल्या मांजर (Pangolin, Manis
crassicaudata Gray), साळींदर/सायल (Hystrix indica), लाजवंती माकड (Slender
loris), उडती खार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. गेल्या काही दशकांमध्ये पश्चिम विदर्भातुन मांसाहारी जीवांचे प्रमाण अतोनात
घटल्याने शेतीला हरिण, राण डुक्कर आणि निलगायींचा अतोनात त्रास वाढला आहे.
3.3
पक्षी:
पक्षांकरिता विदर्भ
एक प्रकारचे नंदनवन आहे. विदर्भात सुमारे ५०० पक्षांच्या प्रजाती आढळतात. पश्चिमेकडच्या
गवताळ राणांमध्ये तणमोरासारखा दुर्मिळ पक्षी तर पुर्वेकडच्या भंडारा जिल्ह्यात सारस
क्रेण आणि चंद्रपूर मध्ये माळढोक पक्षी सुद्धा आढळतो. विदर्भातल्या मेळघाट मध्ये राणपींगळा
(फारेस्ट आउलेट) हा दुर्मिळ पक्षी तर, भारतभरात झपाट्याने कमी होत असलेले गिधाड गडचिरोलीच्या
दक्षिणेकडील भागात अजूनही दृष्टीस पडतात. मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या तलावांमुळे
दरवर्षी स्थलांतरीत पक्षी सुद्धा येथे येतात. अतीषय दूर्मिळ गणला जाणारा धावी (जेरडन
कोर्सर) हा पक्षी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यात आढळण्याची शक्यता नागपूर येथील पक्षांचा
अभ्यास करणाऱ्या व्हि.एन.एच.एस. ह्या संस्थेने केलेल्या अभ्यासातुन समोर आली आहे.
3.4
वनस्पती
विदर्भाच्या पुर्वेकडील
जंगलात प्रामुख्याने साग (Tectona grandis), बांबू (Bambusa arundinacea),
ऐन (Terminalia tomen-tosa),
बिजा (Pterocarpus marsupium),
तेंदू, धावडा (Anogeissus latifolia),
मोहा, आवळा, शिसम (Dalbergia
lalifolia), भिरा (Chloroxylon Swietenia),
चार (Buchananialatifolia),
गराडी मोठ्या प्रमाणावर आढळतात. नदी आणि नाल्याच्या बाजुला असलेल्या वृक्षांमध्ये प्रामुख्याने
कुसुम आणि अंजन चा समावेश होतो. विदर्भाच्या ज्या जिल्ह्यात मातीत शुष्कता अधिक असते
व माती कठीण स्वरुपाची असते अशा ठिकाणी पळस, खैर मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. विदर्भात
उपरोक्त वनस्पती वैभवा सोबतच कमी अधिक प्रमाणात केकडा, कसाई, करई, परड, हलदू, सेमल,
सालई, तिवस सुद्धा आढळून येतात. नजीकच्या काळात विदर्भात सर्वदूर गाजर गवत, लॅंटेना
ह्या परदेशी प्रजाती सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसरत चाललेल्या दिसुन येतात.
3.5
गौन
वन उपज
जंगलातील गौन वन उपजांमधून
सुद्धा लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. महत्त्वाच्या गौन वन उपजांमध्ये
डिंक, चारोळी, मध, बांबू, तेंदू पान, मोहा फुल व टोळी, लाख, हिरडा, आवळा, बांबू ह्यांचा
समावेश होतो. मेळघाटामध्ये रुसा चे सुगंधी तेल सुद्धा काढून विक्री केली जाते. रुसा
चे तेल सिंबोपोगान नावाच्या गवतापासून काढल्या जाते.
3.6
व्याध्र
प्रकल्प (Tiger Projects)
महाराष्ट्रातील
४ व्याध्र प्रकल्पांपैकी ३ हे विदर्भात वसलेले आहेत (पेंच, मेळघाट आणि ताडोबा-अंधेरी).
अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस वसलेल्या मेळघाट व्याध्र प्रकल्पाची घोषना १९७३-७४ साली
करण्यात आली. तापी नदी व सातपुड्याच्या गवळीगढ डोंगर रांगांनी मेळघाटची सिमा निश्चित
होते. खांडू, खापरा, सिपना, गडगा आणि डोलार ह्या ५ नद्यांच्या खो-यात मेळघाट वसलेले
आहे. पेंच व्याध्र प्रकल्प हा विदर्भातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील शिवनी ह्या जिल्ह्यात
पसरलेला आहे. चंद्रपुर जिल्ह्यात स्थित ताडोबा व्याध्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात
जुने राष्ट्रिय उद्यान असून १९५५ साली ताडोबाला राष्ट्रिय उद्यान घोषीत करण्यात आले. स्थानीक आदिवासी
लोकांच्या देवाच्या नावावरुन (ताडोबा किंवा तारु) ह्याला ताडोबा आणि अंधारी नदीच्या
नावाने अंधारी म्हटल्या जातं.
3.7
राष्ट्रिय
उद्याने (National Parks)
महाराष्ट्रातील
६ राष्ट्रिय उद्यानांपैकी ४ विदर्भात वसलेले आहेत. विदर्भात गुगामल राष्ट्रिय उद्यान
(अमरावती) ३६१.२८ वर्ग कि.मी., नवेगाव राष्ट्रिय उद्यान (गोंदिया) १३३.८८ वर्ग कि.मी.,
पेंच राष्ट्रिय उद्यान (नागपूर) २५७.२६ वर्ग कि.मी. तसेच ताडोबा राष्ट्रिय उद्यान
(चंद्रपूर) ११६.५५ वर्ग कि.मी. आहेत.
3.8
वन्यजीव
अभयारण्ये (Wild life sancturies)
महाराष्ट्रातील
३५ वन्यजीव अभयारण्यांपैकी पैकी १४ विदर्भात वसलेले असून त्याचे एकत्रित क्षेत्रफळ
२०८३.६९ वर्ग कि.मी. आहे. विदर्भातील वन्यजीव अभयारण्यात खालील अभयारण्यांचा समावेश
होतो.
अ.क्र.
|
वन्यजीव अभयारण्याचे नाव
|
जिल्हा
|
एकुण क्षेत्रफळ वर्ग कि.मी.
|
१
|
भामरागड
वन्यजीव अभयारण्य
|
गडचिरोली
|
१०४.३८
|
२
|
चपराळा
वन्यजीव अभयारण्य
|
गडचिरोली
|
१३४.७८
|
३
|
नागझीरा
वन्यजीव अभयारण्य
|
भंडारा
|
१५२
|
४
|
बोर
वन्यजीव अभयारण्य
|
वर्धा
|
६१.१०
|
५
|
अंधारी
वन्यजीव अभयारण्य
|
चंद्रपूर
|
५०९.२७
|
६
|
काटेपूर्णा
वन्यजीव अभयारण्य
|
अकोला/वाशिम
|
७३.६३
|
७
|
वान
वन्यजीव अभयारण्य
|
अमरावती
|
२११
|
८
|
नरणाळा
वन्यजीव अभयारण्य
|
अकोला
|
१२.३५
|
९
|
टिपेश्वर
वन्यजीव अभयारण्य
|
यवतमाळ
|
१४८.६३
|
१०
|
कारंजा
सोहोळ वन्यजीव अभयारण्य
|
वाशिम
|
१८.३२
|
११
|
पैनगंगा
वन्यजीव अभयारण्य
|
यवतमाळ/नांदेड
|
३२४.६२
|
१२
|
आंबाबरवा
वन्यजीव अभयारण्य
|
बुलढाणा
|
१२७.११
|
१३
|
लोणार
वन्यजीव अभयारण्य
|
बुलढाणा
|
१.२७
|
१४
|
ज्ञानगंगा
वन्यजीव अभयारण्य
|
बुलढाणा
|
२०५.२३
|
|
एकूण
क्षेत्रफळ
|
२०८३.६९
|
तक्ता: २. विदर्भातील
वन्यजीव अभयारण्ये
4. नद्या व तलाव
4.1
नद्या:
विदर्भाचा प्रदेश हा बृहद पातळीवर
गोदावरी आणि तापीच्या खोऱ्यात मोडतो. विदर्भातील वर्धा व वैनगंगा या नद्या दक्षिण वाहिनी
असून त्यांचा उगम महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश राज्यात आहे.
4.1.1 गोदावरी खो-यातील नद्या:
1. वैनगंगा: मध्यप्रदेशच्या मायकल पर्वत
रांगांमध्ये उगम पावनारी वैनगंगा चंद्रपुर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया जिल्ह्यातुन
वाहत जाते. वैनगंगेच्या उपनद्यांमध्ये कन्हान, बावनथडी, अंबागड, बोदेलकसा, चोरखामरा,
बाघ, चुलबंध, पांघोडी, सुज, गारवी, चंदन, कठाणी, मिरगाडोला ह्या नद्यांचा समावेश होतो.
2. प्राणहिता: वैनगंगा आणि वर्धा नदीच्या मिलनाने
प्राणहिता नदी निर्माण होते व गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षीण-पश्चिम सिमेवरुन १९० कि.मी.
वाहत जाऊन प्राणहीता गोदावरीला मिळते. दिना नदी ही प्राणहितेची मुख्य उपनदी आहे.
3.
पैनगंगा:
बुलढाणा जिल्ह्याच्या पश्चिम सिमेवरुन चिखली-बुलढाणा पठारात उगम पावनारी पैनगंगा ४८०
किमी वाहत जाऊन चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस जवळ वर्धा नदीला मिळते. पैनगंगेच्या उपनद्यांमध्ये
अडाण, कडकपुर्णा, पुस, वाघाडी,
विदर्भ इत्यादी नद्यांचा समावेश होतो.
4.
वर्धा:
वर्धा नदीला वशिष्ठ नदी सुद्धा म्हणतात. आख्यायीक आहे की वशिष्ठ ऋषींनी ह्या नदीची
निर्मिती केली. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई जवळ सातपुड्याच्या डोंगर
रांगामध्ये समुद्र सपाटी पासुन ७७७ मीटर उंचीवर वर्धेचा उगम होतो. उगमानंतर फक्त ३२
कि.मी. इतक्या अंतरापर्यंत वर्धा नदी मध्य प्रदेश मध्ये वाहते. महाराष्ट्रात प्रवेश
केल्या नंतर ५२८ कि.मी. इतके अंतर पार करुन वैनगंगेला मिळते व प्राणहीता नावाने गोदावरीला
जाऊन मिळते, वर्धेच्या उपनद्यांमध्ये कार, वेणा, जाम, इरई, मडू, बेंबळा, पैनगंगेचा
समावेश होतो. वर्धा नदीवर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी जवळ अप्पर वर्धा हे विशाल धरण
बांधण्यात आले आहे.
5.
इंद्रावती:
ओरिसा तील कालाहांडी जवळ पुर्व घाटात उगम पावणारी इंद्रावती विदर्भातील गडचिरोली व
छत्तीसगढची नैसर्गिक सिमा रेषा बनते. इंद्रावती गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातील
कोवांडे गावाजवळ विदर्भात शिरते. गोदावरीला जाऊन मिळण्याआधी गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण
पश्चिम सिमा बनते व १२० कि.मी. वाहत जाऊन गोदावरीला मिळते. पर्लकोटा (निंबरा), पामुलगौतम
(कोटरी) व बांदीया ह्या तिच्या मुख्य उपनद्या आहेत.
4.1.2 तापी खो-यातील नद्या:
पुर्णा :
मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात भैसदेही जवळ सातपुड्याच्या रांगांमध्ये पुर्णा उगम
पावते. मध्य प्रदेश मधुन दक्षीण व दक्षीण पुर्व ५० कि.मी. वाहत जाऊन अमरावती जिल्ह्यात
प्रवेश करते. अमरावती जिल्ह्यातुन दक्षीण-पश्चिम दिशेने वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यातील
मुक्ताई नगर जवळ तापी नदीला मिळते.
4.2
तलाव:
विदर्भ
हा तलावांसाठी सुप्रसिद्ध असा प्रदेश आहे. बुलढाणा जिल्हात लोणार हे विदर्भातील एकमेव
नैसर्गिक सरोवर आहे. भंडारा जिल्ह्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर एका अभ्यासानुसार जिल्ह्यात
सुमारे ४३३८१ तलाव आहेत. इतक्या मोठ्या संखेने ही तलाव २५०-३०० वर्षांपूर्वी कोहली
ह्या जन जातींनी निर्माण केली[i]. विदर्भात
सर्व दूर जमीनदारी, मालगुजारी सारख्या पारंपरिक तलांवांचे जाळे बघायला मिळते.
लोणार सरोवर: लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यातले खार्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती
उल्कापातामुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या
जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची
निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा
काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे
सापडला आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या या सरोवरात मंगळावरील विषाणू सापडला
असून 'बेसिलस ओडीसी' असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते.
या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.
4.3
मत्स्य
विविधता:
विदर्भातील
नद्यांमध्ये सुमारे १५०-२०० प्रजातींचे मासे आढळतात. पूर्वेकडच्या जिल्ह्यांमधील नद्यांमध्ये
माशांची विविधता जास्त प्रमाणात बघायला मिळते. विदर्भात आढळणाऱ्या दूर्मिळ अशा माश्यांमध्ये
तंबू (Indian long fin eel), कोलशी (Gonoproktopterus
kolus), खवली (Oreichthys cosuatis),
वाडीस (Tor khudree), पोडशी (Tor mussullah), पालोची (Danio aequipinnatus), बोद (Bagarius bagarius) इत्यादींचा समावेश होतो.
स्थानीक मासेमारांच्या मतानुसार नदीमधून माश्यांच्या अनेक प्रजाती गेल्या काही वर्षांमध्ये
लुप्त झालेल्या आहेत. विदर्भात माश्यांच्या परदेशी प्रजाती सुद्धा झपाट्याने वाढत चाललेल्या
दिसतात. अशा परदेशी माश्यांमध्ये ग्रास कार्प (Ctenopharyngodon idellus), कामन कार्प (Cyprinus capio), चंदेरा (Hypophthalmichthys
molitrix), बिग हेड (Hypophthalmichthys
nobilis), आफ्रिकन मागूर (Clarias
gariepinus) इत्यादींचा समावेश होतो.
5. शेती:
5.1
पूर्व
विदर्भ:
पावसाच्या
आणि मातीच्या विविधतेमुळे विदर्भातील शेतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विविधता दिसुन
येते. पुर्वेकडील जिल्ह्यांमध्ये (भंडारा, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर) जीथे पाऊस
सुमारे १५०० मी.मी. इतका पडतो शेतीची पीक पद्धती
अन्य ठिकाणापेक्षा वेगळी आहे. उपरोक्त जिल्ह्यांमध्ये नदीकाठची जमीन सोडली तर इतर ठिकाणची
माती ही लॅटेराईट (lateritic) ह्या माती प्रकारात मोडते ज्यात लोहाचे प्रमाण जास्त
असते. अशा मातीमध्ये सछिद्रता भरपूर असते पण जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता नगण्य असते.
उपरोक्त जिल्ह्यांमध्ये धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते.
5.2
पश्चिम
विदर्भ
पश्चिम
विदर्भातील अमरावती. अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये ६५० ते ८५० मी.मी. इतका
पाऊस पडतो. ह्या जिल्ह्यांमध्ये फक्त अमरावती जिल्ह्यातील उत्तरेकडचे धारणी व मेळघाट
ह्या डोंगराळ तालुक्यांमध्येच जिथे पावसाचे प्रमाण जास्त असते, धानाचे पीक घेतल्या
जाते. पश्चिम विदर्भातील ह्या ४ जिल्ह्यांमध्ये काळी माती (black cotton soil) आढळून
येते आणि जमीनीखाली प्रामुख्याने दखन्नच्या पठारावर आढळणारा कठीण अग्निजन्य खडक आढळतो.
इथल्या मुख्य पिकांमध्ये सोयाबीन, कापूस, तुर, ज्वारी चा समावेश होतो.
5.3
मध्य
विदर्भ
मध्य
विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्हे हे उंच सखल भूस्तर रचना असलेले जिल्हे असून
इथे ९०० ते १३०० मी.मी. इतका पाऊस पडतो. मातीचा प्रकार ह्या तिन जिल्ह्यांमध्ये विविधतापूर्ण
आहे. वर्धेच्या खोऱ्यात बऱ्याच ठिकाणी चुणखडी युक्त माती आढळते. मातीचा प्रकार लॅटेरायटीक
(पूर्व नागपूर) ते काळी (यवतमाळ) असा आहे. मूख्य पिकांमध्ये सोयाबीन, ज्वारी, कापूस,
मिरची इत्यादींचा समावेश होतो.
विदर्भातली
सुपीक अशी शेती अजूनही वाणांच्या पारंपरिक जाती जतन केल्या गेल्या आहेत. खास करुन विदर्भातल्या
पूर्वेकडच्या जिल्ह्यांमध्ये धानाच्या कितीतरी जाती अजूनही संरक्षीत करुन ठेवण्यात
आल्या आहेत.
6. खनिज संपत्ती:
विदर्भात
दगडी कोळसा, मॅगॅनीज, लोह, क्रोमाइट, कायनाइट, कुरुविंद, सिलिमनाइट ही खनिजे आढळतात.
मॅग्नीज आणि दगडी कोळसा या दोन्ही बाबतींत विदर्भ समृद्ध असून त्यापासून फार मोठे उत्पन्न
सुद्धा आपल्याला मिळते (बघा तक्ता १).
जिल्हा
|
खनिजे
|
नागपूर
|
मॅंगनीज, कोळसा, डोलोमाईट,
रेती, क्वार्ट्झ
|
चंद्रपूर
|
कोळसा, लोह, चुनखडी,
डोलोमाईट, फ्लुराईट, रेती, तांबे, बाराईट्स
|
गडचिरोली
|
लोह
|
भंडारा
|
मॅंगनीज, लोह, क्रोमाईटस,
कायनाईट/सिलिमानाईट/कोरुंडम, क्वार्ट्झ क्वार्झाइट, रेती.
|
गोंदिया
|
क्वार्ट्झ, लोह
|
यवतमाळ
|
कोळसा, चुणखडी, डोलोमाईट,
रेती
|
अमरावती
|
फायर क्ले
|
तक्ता ३: विदर्भातल्या
विविध जिल्ह्यात सापडणारी खनिजे.
7. जन जातीय विविधता
मानव जातीचा उगम आफ्रिकेच्या गवताळ
प्रदेशात झाला असावा या बाबतीत आता सर्व शास्त्रज्ञांचं एकमत झालं आहे. मानवाच्या उत्कांतीची
कहाणी मीओसीन काळात (२० दसलक्ष वर्षांआधी) सुरु झाली जेंव्हा मानसाचे वंशज आफ्रिकेच्या
प्रदेशात बरेच पसरले. १५०,००० वर्षांपासून आधुनीक मानव (Homo sapiens sapiens) ह्या पृथ्वीवर आहे. संसाधनांच्या शोधात, नवनविन
परिस्थितीकीय परिघांना (Niche) व्यापन्यासाठी, जवळपास १ लाख वर्षांआधी आपले वंशज जगभरात
पसरले. भारत हा त्यांना आफ्रिकेतुन जगभरात पसरण्यासाठी एक प्रकारचा राजमार्ग होता.
भारताताचे मुळ निवासी हे ऑस्ट्रो असीयाटीक
(austro-asiatic) कुलाची भाषा बोलणारे आदिवासी. हे लोक भारतातले सर्वात जुणे रहिवाशी.
हे लोक आस्ट्रीक कुलातली भाषा बोलतात (कंबोडीया
आणि वियेतनाम मध्ये ह्या कुलाची भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाते). आज भारतात ही
भाषा बोलनारे आदिवासी हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत. यांना शेतीची कला अवगत नसावी,
यांची कधी साम्राज्य निर्माण झाली नाहीत. हे आदिवासी विदर्भात सुद्धा आढळतात, मेळघाटामधले
कोरकू हे त्याचे एक उदाहरण. मानसाचा दुसरा जथ्था हा द्रविडीयन लोकांचा भारतात पोहोचला.
हे इरानच्या नैऋत्य भागातल्या एलाम प्रांतातुन
भारतात आले असावे. ह्यांना शेतीचं आणि पाळीव जनावरांचं बरचं ज्ञान होतं, हे लोक द्रविडीयन
भाषा बोलायचे (गोंडी, तेलगू, कन्नड इत्यादी) यांची साम्राज्यं निर्माण झालीत. हे सुद्धा
विदर्भात आढळतात. गोंड हे त्यातलं एक उदाहरण. विदर्भातील गोंडांचं साम्राज्य सुप्रसिद्ध
होतं. भारतातल्या आदिवासींचा तीसरा गट म्हणजे तीबेटो बर्मन भाषा बोलणारे आदिवासी, हे
भारताच्या आग्नेय भागात वास्तव्यात आहेत. हे लोक भारतात तिबेट आणि बर्मा मधुन आले.
भारतातला नंतरचा मानव वंशशास्त्रिय वर्ग आर्यांचा, हा सुद्धा वर्ग विदर्भात आहे. एकुणच
काय तर नैसर्गिक विविधतेच्या जोडीने विविधतापूर्ण अशी मानव वंश शास्त्रिय परंपरासुद्धा
विदर्भात निर्माण झाली आहे. गोंड, कोरकू, कोलाम, परधान सारख्या विदर्भातल्या आदिवासी
जमाती, भोई, ढीवर, केवट सारख्या मासेमार करणाऱ्या जनजाती, पारधी, धनगर सारख्या भटकंती
करणाऱ्या जनजमाती निसर्गाशी आत्मियतेने तर जोडलेल्या आहेतच पण निसर्गाबद्दलच्या पारंपरिक
ज्ञानाचा अनमोल साठा सुद्धा आपल्याकडे ठेऊन आहेत. खास करुन गडचिरोली, भंडारा, गोंदीया
व चंद्रपुरच्या आदिवासी भागात निसर्ग संवर्धनाच्या पारंपरिक पद्धती अजूनही आदिवासींकडून
पाळल्या जातात. अशा निसर्ग संवर्धनाच्या पद्धतींमध्ये काही प्रजातींना पवित्र प्रजाती
(totemic species) मानून त्यांना संरक्षण प्रदाण करणे, विविध प्रजाती वापरण्यावर धार्मिक
नियंत्रण आनने, काही विषिष्ट वयातच काही प्रजाती वापरणे, विशिष्ट तिथीपासूनच काही प्रजाती
वापरणे, काही जागांना, नद्यांच्या काही डोहांना संरक्षण देण्याचा समावेश होतो.
·
लोक ज्ञान
जवळ
जवळ ६० हजार वर्षांआधी माणसाने भाषेचा शोध लावला असावा. क्लिष्ट अशा प्रतिकात्मक भाषेच्या
उगमासोबतच माणसाने आधुनिक ज्ञान व्यवस्थेची मुहुर्तमेढ केली असं आपल्याला म्हणता येईल.
जवळपास १० हजार वर्षांच्या आधी, जेंव्हा शेतीची सुरुवात झाली, त्याआधी मानसाचे विविध
समुह हे छोट्या छोट्या गटात, एकजीनसी स्वरुपात, वास्तव्यास होते. विविध प्रकारच्या
समुहात फारसा काही संबंध नसावा कारण ते वेगवेगळ्या भाषा बोलायचे. त्यामुळे ज्ञानाचे
प्रवाह हे प्रत्येक समूहासाठी भिन्न भिन्न होते आणि विविध समूहातील ज्ञानात फारशी देवाणघेवाण
नव्हती. पण शेतीच्या आणि पशुपालनाच्या सोबतच विविध मानवी गटातील एकटेपणा दूर व्हायला
लागला आणि विविध गटांचे परस्परांशी संबंध स्थापीत व्हायला लागले. ह्यामुळे विविध ज्ञानाचे
प्रवाह एकत्र यायला लागले असावेत आणि खास प्रकारच्या ज्ञानाची जोपासणा करणाऱ्या लोकांचे
समूह निर्माण व्हायला लागले, उदा. वैदू इत्यादी. अशा प्रकारे शिकारी आणि भटक्या अवस्थेतील
माणसाने शेती करायला सुरुवात करताच विविध प्रकारच्या ज्ञानाच्या प्रवाहांनी एकत्र येउन
ज्ञानाचा एक विषाल असा साठा निर्माण झाला. विदर्भातील आदिवासी लोक अशा मौल्यवान ज्ञानाचा
साठा आपल्या जवळ बाळगून आहेत.
8. पर्यावरणीय प्रश्नांचा वाढत चाललेला
विळखा
8.1
सर्वसामान्य
प्रश्न
अशा ह्या पर्यावरणीय दृष्ट्या
सधन अशा भूभागाची पर्यावरणाची सद्य परिस्थिती आणि बदलांची दिशा एक चिंतेचा विषय आहे.
वातावरणातील बदल, जंगलांचा नाश, जैवविविधतेत होत असलेली घट, परदेशी प्रजातींचे आक्रमण,
प्रदूषण, जमीनीतल्या पाण्याची पातळी कमी होणे, माती वाहून जाणे, शेतीची सुपीकता कमी
होणे, पारंपरिक वाण नष्ट होणे, किटकनाशकांचा व रासायणीक खतांचा वाढत चाललेला वापर अशा
जागतीक प्रश्नांपासून विदर्भ सुद्धा ग्रासत चालला आहे.
8.2
खराब
होत चाललेली जमीन
जमीनीचा पोत खराब होण्याचा वेग विदर्भात आता जोर पकडतो आहे. एका अभ्यासानुसार
विदर्भात २.१ दसलक्ष हेक्टर म्हणजेच विदर्भाच्या एकुणचा क्षेत्रफळाच्या २१.५ टक्के
इतकी जमीन अवनत होत चालली आहे. यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त अवनत भूमी
आहे तर नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा जिल्हे साधारण समस्येने ग्रासलेले आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांमध्ये जमीन खराब होण्याचा प्रश्न तितकासा गंभीर
नाही. या ही पुढे जाऊन हा अभ्यास हेही स्पष्ट करतो की जमीन खराब होण्याचे प्रमाण हे
शेती ह्या जमीन प्रकाराशी जास्त संबंधीत आहे[ii].
8.3
जैवविविधतेचा
ह्रास
विदर्भाच्या खुरटे जंगलात तसेच
गवताळ पट्यांमध्ये आढळणारा चित्ता फार पुर्वीच नष्ट झाला आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणावर
आढळणारी गिधाडे नामशेष झाली आहेत. माश्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन तिलापीया, आफ्रिकन
मागूर, ग्रास कार्प, सिल्वर कार्प सारख्या प्रजाती आता विदर्भातल्या नद्यांमध्ये सुद्धा
आढळायला लागल्या आहेत. पुर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या आकाराच्या झिंग्याचे
(Tiger prawn, Macrobrachium
malcolmsonii) चांगले उत्पादन पुर्वी व्हायचे.
पण आता त्याचे प्रमाणही घटले आहे. विदर्भातली वाघांची संख्या वाढत चालली आहे ही जरी
आनंदाची बाब असली तरी जंगलाच्या क्षेत्रात होत असलेल्या कमतरतेमुळे इतके वाघ कोठे राहतील
असा परिस्थितीकी शास्त्राचा प्रश्न ही उद्भऊ लागला आहे. विदर्भातील जंगलात मोठ्या प्रमाणात
आग्या माशींची मधाची पोळी सहज दृष्टीस पडायची पण आता त्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते.
परिणामत: मानव-वन्य जीव संघर्षाचा आलेख सुद्धा वाढत चाललेला दिसतो.
8.4
शेतीचे
प्रश्न
शेतीच्या पिक पद्धतींमध्ये गेल्या काही दशकांमध्ये
आलेल्या परिवर्तनामुळे विदर्भातली शेती ही एक धोक्यात असलेली परिसंस्था बनत चाललेली
आहे. सरकारी अनास्थेसोबतच पर्यावरणीय बदलांचा फटका शेतीला बसून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा
आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. धानाच्या व अन्य पिकांच्या पारंपरिक जाती नष्ट
होऊन एकसुरीपणाच्या शेतीकडे वाटचाल सुरु झाली आहे. वाशिम जिल्ह्यात पूर्वीच्या काळी
मोठ्या प्रमाणावर आमराया होत्या. परंतू गेल्या काही दशकांमध्ये जिल्ह्यातल्या आमराया
मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या दिसतात. वाशिम जिल्ह्यातला
शेतकरी जेव्हां कर्जामध्ये आकंठ बुडाला, किटकनाशकांच्या, रासायणीक खतांच्या अवाजवी
खर्चाला भागवण्यासाठी सर्वप्रथम शेतातली, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा
स्वत:च्या डोळ्यात पाणी आणनारा निर्णय त्याने घेतला. मातीत आधीसारखी ओल टिकत नाही म्हणून
सुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसुकच वाळली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात
वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली. बाजार
प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. स्वस्तात मिळणारी, बाहेरुन येणारी, रसायनांनी पिकवलेली
कलमी, बदाम आंब्यांनी गावराण आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा
बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसीकतेमुळे शेतकरी निरुत्साहीत झाला. आंब्याला जेव्हां
बार नसतो तेव्हा भाव भरपूर, जेव्हां बार भरपूर तेव्हा भाव नाही अशा दृष्टचक्राने शेतकरी
जीथे होता तीथेच राहिला. रस्त्याच्या कडेने एकेकाळी असणारी आंब्याची जुणीजाणती झाडं
रस्त्याच्या रुंदीकरणात कापल्या गेली.
जैवविविधतेच्या ह्रासामुळे पुर्वी
जगण्यासाठी उपलब्ध असलेले अनेक पर्याय आता संकुचीत व्हायला लागले आहेत. चराई करिता
पारंपरिक पद्धतींने राखीव गावलगतच्या गायराणावर अतिक्रमण होऊन पाळिव जनावरांसाठी चाऱ्याचा
प्रश्न सुद्धा बिकट बनतो आहे.
8.5
तलावांचे
प्रश्न
विदर्भ हा मानवनिर्मित तलावांसाठी
सुप्रसिद्ध प्रदेश पण आज विदर्भातले तलाव गाळ साचणे, तलावाचे खोरे नष्ट होणे, बेशरम
सारख्या वनस्पतींनी तलाव क्षेत्र नष्ट होणे सारख्या प्रश्नांनी ग्रस्त आहेत. जुण्याकाळी
विदर्भातले बहुतांश तलाव हे सामाजीक अखत्यारीत होते. गाव समाजच त्याचे व्यवस्थापन करायचा.
तथापी इ.स. १९५० नंतर अबोलिशन आफ प्रापर्टी राइट्स अक्ट (Abolition of property
rights act, 1950) नंतर सर्व तलाव सिंचन विभागाच्या अखत्यारीत गेले आणि तलावांच्या
देखरेखीचे ज्ञान व व्यवस्था विभागाकडे नसल्याने तलावांचा ह्रास व्हायला सुरुवात झाली.
गेल्या काही दशकांमध्ये भूगर्भातील
पाण्याच्या अती उपश्यामुळे, जमीनीत पाणि मुरण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूगर्भातील
पाण्याची पातळी कमी होत असल्याचे आढळून येते.
8.6
नद्यांचे
प्रश्न
विदर्भातल्या नद्यांची सुद्धा
परिस्थिती आहे झपाट्याने बिघडत चालली आहे. पाण्याचा अती उपसा, नदीच्या खोऱ्यातील झाडोरा
नष्ट होणे, प्रदूषण, धरणे, नदीत गाळ साचणे अशा अनेक कारणांनी विदर्भातील नद्यांची परिस्थिती
खालावत चालली आहे. प्रदुषणाने नागपूर, अकोला सारख्या वेगाने विकसीत होत चाललेल्या शहरांलगतच्या
नद्या मृत पावत आहेत.
8.7
लोक
ज्ञानाचा ह्रास
पर्यावरणीय नकारात्मक बदलाचा परिणाम
पर्यावरणाशी निगडीत लोक ज्ञानावर सुद्धा होतो आहे. आधारीत लोक व नवीन पिढी निसर्गापासून
दूर चालल्यामुळे पारंपरिक ज्ञानाचा ह्रास होतो आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जुणे आदिवासी
३० ते ४० प्रकारच्या जंगली भाज्या, कंद, गवताच्या प्रजातींची माहिती सहजपणे सांगतात.
तथापी नवीन पिढीत असे ज्ञान आढळून येत नाही. जसजसी विदर्भातली शेती ही बाह्य घटकांवर
(बाहेरचे बियाणे, खते व किटकनाशके) अवलंबून होत गेली तसतसे शेतीबद्दलच्या पारंपरिक
ज्ञानाचा ह्रास झाल्याचे आढळते. विदर्भातल्या मासेमार जनजातींकडे असणाऱ्या जाळ्यांच्या
बाबतीत मोठ्या प्रमाणावर विविधता बघायला मिळायची. सिथेंटीक जाळ्यांच्या आगमनाने अशी
विविधता नष्ट झालेली दिसून येते. सोबतच औषधी वनस्पतींबद्दलच्या लोकज्ञानाचा ह्रास सुद्धा
मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
9. शाश्वत विकासाचा मार्ग
विदर्भाच्या पर्यावरणीय अंगाने
विकासाचा विचार करतांना अनेक मूलभूत गोष्टींची चर्चा होणे गरजेचे आहे. शाश्वत विकासाचे
उद्दीष्ट हे समाजातील सर्वच घटकांच्या विकासामुळे साद्य होत असते. एकीकडे शेतकरी आत्महत्या
करीत आहेत, आदिवासी त्यांच्या अधिकारांपासून वंचीत आहेत, कुपोषनाचे प्रमाण वाढत चाललेत,
बालमृत्यू मोठ्या प्रमाणावर घडत आहेत आणि दुसरी कडे समाजातला एक छोटासा वर्ग सर्व सुविधा
मिळवत आहे याला शाश्वत विकास म्हणता येणार नाही. विदर्भाचा शाश्वत विकास हा जंगल आणि
शेती आधारीतच होऊ शकतो ही बाब प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. केवळ मोठ्या धरणांचीच
कास न धरता छोट्या विकेंद्रित पद्धतीने सिंचन वाढवणे, शेतीला जास्तीत जास्त फायदा देणारी
व्यवस्था बनवणे, शेतीचा अतोनात वाढलेला खर्च कमी करणे, जंगल आधारीत लोकांना जंगलावरचे
अधिकार बहाल करणे, निसर्गाला सूस्थितीत आणणाऱ्या प्रयत्नांना, कायद्यांना समाजात रुळवणे
गरजेचे आहे. पानवठ्यांच्या बाबतीत स्थानीक मासेमार सारख्या जनजातींच्या मदतीने संपूर्ण
खोऱ्याच्या नियोजनाचा विचार करणे गरजेचे आहे.
विदर्भातील पर्यावरनाचा विचार
करतांना वन विभाग, मत्स्य विभाग, सींचन विभाग, कृषी विभाग, प्रदूषन नियंत्रण विभाग
इत्यादींच्या भूमिकांचा विचार होणे अत्यावश्यक आहे. इंग्रजांच्या काळात स्थापन झालेले
या पैकी बहुतांश विभाग अजून ही आपली कात टाकायला तयार नाही. नैसर्गिक घटकांबद्दलचे
अज्ञान, सर्व दूर पसरलेल्या भ्रष्टाचाराच्या पाळेमुळ्या, निसर्गाधारीत लोकांबद्दलच्या
आस्थेची कमतरता अशा अनेक कारणांमूळे हे विभाग पांढरा हत्ती ठरत आहेत. मत्स्य विभागाजवळ
असलेल्या मास्यांच्या परिस्थितीबद्दलच्या तोकड्या ज्ञानामुळे आणि केवळ उत्पादन वाढ
ऎवढाच हेतू ठेवल्यामुळे मास्यांच्या अनेक परदेशी प्रजातींनी घर केले आहे. तलावांच्या
सर्वांगीन व्यवस्थापनाबद्दल असलेल्या सिंचन विभागाजवळच्या तोकड्या ज्ञानामुळे विदर्भातील
अनेक तलाव आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत निसर्गाशी संबंधीत सर्व
विभागांच्या पुनर्रचनेचा विचार होणे अगत्याचे आहे.
आज अनेक लोकोपयोगी कायदे पर्यावरणासाठी
संजीवनी ठरतील अशी खात्री वाटते. महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी कायदा
२००५ (Mahatma Gandhi National
Rural Employment Guarantee Act, २००५) चा उपयोग करुन नष्ट होत
चाललेला निसर्ग सुस्थितीत तर आणताच येईल सोबतच स्थानीक ठिकाणी निर्माण होणारा रोजगाराचा
प्रश्न ही सोडवता येईल. २००२ साली पारीत झालेल्या जैवविविधता कायदा (Biodiversity
Act 2005) चा वापर करुन जैवविविधतेच्या दस्तावेजीकरनाला बळकटी देता येईल. पिक प्रजाती आणि शेतक-यांचे अधिकार कायदा २००१ (Plant Varieties and Farmers' Rights Act 2001) चा वापर करुन पिकांच्या पारंपरिक
वाणांच्या संवर्धनाच्या, ज्या शेतक-यांनी पिकांच्या पारंपारिक प्रजातींचं संगोपन केलं
आहे अशा शेतक-यांना प्रत्यक्ष फायदा मिळऊन देता येईल. २००६ साली पारित झालेल्या वनाधीकार
कायद्याने (Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognition of
Forest Rights) Act, 2006) आदिवासींच्या जंगलावरील अधिकाराला मान्यता दिली आहे. ह्या
कायद्यांची व्यवस्थित अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.
निसर्गातील विविध घटकांच्या संबंधीत
विदर्भात माहितीचा नितांत अभाव आहे. शाश्वत नियोजनाचा आधार हा चांगल्या माहितीवर अवलंबून
असतो. अशा परिस्थितीत पर्यावरणाच्या बाबतीत विदर्भात माहितीचा इत्यंभूत कोष निर्माण
होणे अत्यंत गरजेचे आहे.
विदर्भाला सोण्याची कुऱ्हाड पुन्हा
बनवण्यासाठी निसर्गाला शाश्वत बनविण्याखेरीज दुसरा मार्ग नाही.
10.
आभार:
उपरोक्त लेख लिहितांना संवेदना
संस्था, कारंजा चे कौस्तूभ पांढरीपांडे, डा. दिवाकर इंगोले, विकल्प संस्थेचे पवन मिश्रा,
वन विभागाचे अशोक कविटकर यांनी केलेल्या मदती बद्दल लेखक त्यांचा आभारी आहे.
संदर्भ:
जिल्हावार
शासनाने प्रकाशीत केलेली गॅझेटीयर.
[i]
Rajankar Manish and Dolke Y. 2001. Decline of a Grand Tradition. In Making
Water Everybody’s business. Centre for Science and Environment. Page 30-32.
[ii]
S G
Ghatol and R L Karale. (2000) Assessment of degraded lands of Vidarbha
Region using remotely sensed data. JOURNAL
OF THE INDIAN SOCIETY OF REMOTE SENSING Volume 28, Numbers 2-3, 213-219.
No comments:
Post a Comment